Home Business महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नवीन बोधचिन्ह “महा हॅण्डलूम”चे अनावरण

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नवीन बोधचिन्ह “महा हॅण्डलूम”चे अनावरण

नागपूर ब्यूरो: महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाद्वारे उत्पादित हातमाग वस्त्रांना बाजारपेठेत योग्य स्थान मिळावे याकरिता नवीन रूप देण्याचे दृष्टीने “महा हॅण्डलूम” या नावाने बोधचिन्ह तयार करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण बुधवारला राज्यचे वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांचे शुभहस्ते आणि पराग जैन (भा.प्र.से., प्रधान सचिव, वस्त्रोद्योग) व शीतल तेली-उगले, (भा.प्र.से., आयुक्त वस्त्रोद्योग व व्यवस्थापकीय संचालक, हातमाग महामंडळ) यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नवीन बोधचिन्हामुळे आधुनिक युगात बाजारपेठेत महाराष्ट्राच्या हातमाग वस्त्रांना नवीन ओळख मिळून त्यांची छाप पडेल व महाराष्ट्राची परंपरा पुढे नेण्यास निश्चित यश मिळेल; असे मत व्यक्त करून माननीय मंत्री महोदयांनी शुभेच्छा दिली.

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित; महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत प्रतिष्ठान असून सन 1971 पासून हातमाग व्यवसायाशी जुळलेले आहे. महाराष्ट्रातील परंपरागत हातमाग व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी व कुशल हातमाग विणकरांद्वारे उत्पादित उच्च प्रतीच्या कापडाची ओळख कायम असावी व विणकरांना रोजगार उपलब्ध होत राहावे या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाद्वारे करारपद्धती अंतर्गत विणकरांकडून उत्पादन करून घेण्यात येते व अशा उत्पादित मालाच्या विक्रीची व्यवस्था विक्री केंद्रे, प्रदर्शनी तथा ऑनलाइनच्या माध्यमातून करण्यात येते.
कोविड-19 मुळे संपूर्ण देशात मंदीचे वातावरण असून आर्थिक परिस्थिती डबघाईची झालेली आहे. प्रदर्शनी, मेळावे व उत्सव घेणे शक्य नाही. हातमाग विणकरांनी तयार केलेल्या वस्त्रांच्या विक्रीवर आर्थिक मंदीमुळे फटका बसलेला आहे. कोरोना या आजारामुळे लॉकडाऊन काळात विणकराला वर्क फ्रॉम होम अंतर्गत आवश्यक सुताचा पुरवठा करणे; त्यांना मजुरी देणे जेणेकरून त्यांचेवर उपासमारीची वेळ येऊ नये याकरीता हातमाग महामंडळाशी जोडलेल्या विणकरांना लॉकडाऊन काळात नियमित रोजगार पुरविण्याकरिता हातमाग महामंडळ कसोटीचे प्रयत्न करीत आहे.